७  ते ९ ऑगस्ट; सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची घोषणा

0
485

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – ‘आता सकारात्मक नको, निर्णयात्मक व्हा आणि निर्णय घ्या,’ असे म्हणत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. सातव्या वेतन आयोगासह इतर विविध मागण्यांसाठी ७  ते ९ ऑगस्ट असा तीन दिवसीय संप घोषित केला आहे, अशी माहिती राज्य सरकारी राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली.

सातवा वेतन आयोग, रिक्त पदांची भरती, पाच दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करा या प्रलंबित मागण्यांसाठी संप करण्यात येत आहे. तब्बल दीड लाख अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. ‘अंतरीम वेतनवाढीची वेळ निघून गेली आहे. आता ऑक्टोबर २०१८ चा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिला तरच सरकारच्या प्रस्तावाचा विचार करू,’ असे संघटनांनी म्हटले आहे.

‘राज्यभरात १ लाख ८० हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे ७२ हजारांच्या नोकरभरतीला मेगाभरती म्हणत सरकार दिशाभूल करत आहे. ही मेगाभरती नसून लघुभरती आहे,’ अशी टीका कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. एकीकडे राज्यात मराठा आंदोलन सुरू असताना आता राज्य कर्मचाऱ्यांनीही संपाची घोषणा केल्याने सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.