७६ वर्षे विना अन्न-पाणी राहणाऱ्या योगी प्रह्लाद यांचे निधन

0
297

अहमदाबाद, दि. २७ (पीसीबी) – योगी प्रह्लाद जानी उर्फ चुनरीवाला माताजी यांचं मंगळवारी निधन झालं. गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील चराडा गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. जानी यांचा पार्थिव देह बनासकांठा जिल्ह्याच्या अंबाजी मंदिराजवळ त्यांच्या आश्रमात ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे. योगी प्रह्लाद जानी यांचा दावा होता की त्यांनी 76 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अन्न-पाणी ग्रहण केलेलं नव्हतं. गुजरातमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी आहेत. विना अन्न-पाणी राहणाऱ्या योगी प्रह्लाद यांच्या दाव्यासंदर्भात शास्त्रज्ञांनी 2003 आणि 2010 मध्ये अभ्यास देखील केला होता.

योगी प्रह्लाद यांचा दावा होता की, त्यांना अन्न-जल ग्रहण करण्याची गरज नाही कारण देवी मां ने त्यांना जीवंत ठेवलं आहे. त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की, ‘माताजी यांनी काही दिवसांआधी आपल्या मूळ स्थानावर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळं त्यांना त्यांच्या गावी चराडा इथं घेऊन गेलो होतो. त्यांनी तिथंच शेवटचा श्वास घेतला. आज त्यांच्या आश्रमात त्यांचा पार्थिव देह ठेवला जाईल. उद्या, गुरुवारी आश्रमातच त्यांना समाधी दिली जाईल.’

योगी जानी यांची देवी मां अंबेवर खूप श्रद्धा होती. त्यामुळं ते नेहमी चुनरी परिधान करायचे. त्यामुळं ते चुनरीवाला माताजी या नावाने देखील परिचित होते.

त्यांचा दावा होता की, आई अंबेची माझ्यावर अपार कृपादृष्टी आहे. आईच्या कृपेने माझ्या टाळूतून एका द्रव्याचा स्राव होतो. त्यामुळे मला जगण्यासाठी अन्न पाण्याची गरज लागत नाही. त्यांच्या भक्तांचा दावा आहे की, त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून खाणं-पिणं वर्ज केलं होतं.

जानी यांनी गुजरात जवळील एका वर्षावनात अंबाजी मंदिराजवळ आश्रम बनवलं होतं. तिथेच ते एका गुहेत ध्यान धारणा करायचे.