७५ वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये – सुशीलकुमार शिंदे

0
481

सोलापूर, दि. १८ (पीसीबी) – सोलापूरमधील भाजपाच्या खासदाराने काहीच काम केले नाही. भाजपाने फक्त टीका करण्याचे काम केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत याची भीती वाटल्याने सोलापूरमध्ये भाजपाने उमेदवार बदलला आणि जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली, अशी टीका काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली. ७५ वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये, या मताचा मी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सोलापूरमध्ये मतदान केले. सोलापूरमध्ये काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे, भाजपातर्फे लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे रिंगणात आहे. या तिरंगी लढतीबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानानंतर भाष्य केले. शिंदे म्हणाले, तिरंगी लढतीची ही पहिलीच वेळ नाही. मी यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये अशा लढतींना सामोरे गेलो.

सोलापूरमध्ये भाजपा खासदाराने एकही काम केले नाही. मी खासदार असताना केलेले काम आजही जनतेसमोर आहे, असा दावा शिंदे यांनी केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा धर्मनिरपेक्ष असून या भागातील मतदारांनी जात, धर्म न पाहता मला मतदान केले, असे त्यांनी सांगितले. जनतेचा आता मोदींवर विश्वास राहिलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

७५ वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये, या मताचा मी आहे. मी गेल्या निवडणुकीतच स्पष्ट केले होते की मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. मात्र, २०१४ मधील पराभवानंतर अनेकांनी मला पुन्हा निवडणूक लढवण्याची विनंती केली. जनतेच्या आग्रहाखातर मी निवडणुकीत उतरलो. पण ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.