Desh

७० वर्षांत अर्थव्यवस्था सर्वात वाईट स्थितीत-  राजीव

By PCB Author

August 23, 2019

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) –  नीती आयोगाचे उपाध्यक्ष, अर्थतज्ज्ञ राजीव कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर वक्तव्य केले आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत असून गेल्या ७० वर्षांमध्ये पाहायला मिळाली नाही, अशी वाईट स्थिती सध्याच्या घडीला निर्माण झाली असल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य करताना राजीव कुमार म्हणाले की, सध्या खासगी क्षेत्रात कुणीही कर्ज देण्यास तयार नाही. तसेच नोटबंदी आणि जीएसटीबाबतच्या निर्णयांनंतर रोखीचे संकट वाढले आहे. यावर सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज कोणीही कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही. ही स्थिती केवळ सार्वजनिक क्षेत्रातच आहे असे नाही, तर खासगी क्षेत्रात देखील कोणी कोणाला कर्ज देऊ इच्छित नाही, असे म्हणत राजीव कुमार यांनी विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले.

सन २००९ पासून ते २०१४ पर्यंत कोणताही मागचा पुढचा विचार न करता कर्जवाटप करण्यात आले. यामुळे सन २०१४ नंतर एनपीएमध्ये ( नॉन परफॉर्मिंग अॅसेट) वाढ झाली. या कारणामुळे बँकांची नवे कर्ज देण्याची क्षमता कमी झाली, असेही राजीव कुमार म्हणाले. बँकांनी कमी कर्ज देण्याची भरपाई एनबीएफसीने केली आहे. एनबीएफसीच्या कर्जात २५ टक्के वाढ झालीय. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नुकत्याच सादर करण्यात आलेला अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.