“७० कोटी रुपयेंच्या टॅब खरेदीचा निर्णय तात्काळ रद्द करा”

0
509

– योगेश बहल यांची निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – गेल्या साडेचार वर्षांत सत्ताधारी भाजपाने महापालिकेतील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी एकही निर्णय न घेतल्याने शाळांमधील विद्यार्थी संख्या घसरत चालली आहे. असे असतानाही आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल 70 कोटी रुपयांच्या टॅब खरेदीचा निर्णय घेतला असून ठेकेदार, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी यातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे टॅब खरेदीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीची ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर योगेश बहल यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

योगेश बहल यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांच्या काळात सत्ताधारी भाजपाने विद्यार्थ्यांना टॅब चालविण्याचे साधे प्रशिक्षणही दिलेले नाही. शिक्षकही टॅब चालविण्यापासून अनभिज्ञ आहेत. मात्र चार महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या आडून 70 कोटी रुपयांची टॅब खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. या खरेदीतून अधिकारी आणि ठेकेदारांचा फायदा तर होणारच आहे मात्र भाजपचे पदाधिकारीही या भ्रष्टाचारातून निवडणूक फंड गोळा करणार आहेत.

शैक्षणिक दानासारख्या पवित्र कामाला टॅब खरेदीद्वारे भ्रष्टाचार करत कलंकित करण्याचा प्रकार महापालिकेमध्ये सुरू आहे. गेल्या साडेचार वर्षांत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. शैक्षणिक गुणवत्ताही घसरली आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ निविदा प्रसिद्ध करणे त्यातून स्वत:चे हित साधणे असे प्रकार सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहेत. त्यामुळे टॅब खरेदीतून होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही निविदा तात्काळ थांबविण्यात यावी.

प्रथमत: महापालिकेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना टॅब चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे यासाठी महापालिकेच्या एखाद्या शाळेमध्ये प्रशिक्षण केंद्र बनविल्यास या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर फंडातून रक्कम जमा होऊ शकते. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात यावे. सध्या ऑफलाईन शाळा सुरू झालेल्या असल्याने तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी झाल्यामुळे टॅब खरेदीचा निर्णय तात्काळ रद्द करावा. आपण टॅब खरेदीद्वारे होणारा भ्रष्टाचार न रोखल्यास तसेच त्याबाबतची निविदा प्रसिद्ध करून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपातून जमा झालेल्या रक्कमेची उधळपट्टी न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल तसेच त्याबाबत न्यायालयात धाव घेऊन आपणाविरोधात कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही या निविदेनात बहल यांनी म्हटले आहे.