५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार – मुख्यमंत्री

0
497

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला कोणताही धक्का  न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज (गुरूवार)  विधानसभेत दिली. तर यावर आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार, त्याची टक्केवारी किती असणार  यासाठी आधी अहवाल सादर करा,  अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे आज विधानसभेचे दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी (दि.२३) गुरुनानक जयंती, त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे आता सभागृहाचे कामकाज थेट सोमवारीच सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.

आज  धनगर, मुस्लीम आरक्षण, दुष्काळ आणि मुंबईत धडकलेला शेतकरी मोर्चा यावरुनही विधानसभेत मोठा गदारोळ माजला. दुष्काळ घोषितच झाला नाही, तर चर्चा कशावर करायची, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण  विखे पाटील यांनी उपस्थित केला.  यावर  मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, मात्र विरोधकांचे  समाधान झाले नाही.  अखेर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करत असल्याची घोषणा केली.