५०० हून अधिक गुंतवणूकदार कोट्याधीश

0
298

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : तुम्ही सुद्धा शेअर मार्केटमधील व्यवहारांमध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीएलमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरु शकते. सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे आयपीओ येत असून गुंतवणूकदार मोठ्या उत्साहाने या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करताना दिसत आहे. आज या लेखात आपण ज्या आयपीओबद्दल बोलणार आहोत त्या आयपीओमध्ये गुंतवणूक करुन ५०० हून अधिक गुंतवणूकदार कोट्याधीश झाले आहेत. कोट्यावधींचा फायदा या कंपनीचं नाव आहे फ्रेशवर्क्स. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील असून बिझनेस सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात काम करते. सॉफ्टवेअर एज ए सर्व्हिस म्हणजेच एसएएएस प्रकारची कंपनी असणाऱ्या फ्रेशवर्क्सने नवीन विक्रम केला आहे. फ्रेशवर्क्स ही अशी पहिली भारतीय कंपनी आहे जी अमेरिकन शेअर बाजारामध्ये लिस्टेट कंपनी झालीय. बुधवारी फ्रेशवर्क्सचा आयपीओ नॅसडॅक या ग्लोबल सेलेक्ट मार्केटमध्ये लिस्ट झाले.

नॅसडॅकमध्ये लिस्टेड कंपन्यांच्या यादीत फ्रेशवर्क्सचा समावेश झाल्यानंतर कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश मात्रुबुथम आणि सुरुवातीपासून कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एक्सेल तसेच सिकोइया समुहांना बराच फायदा झालाय. इतकच नाही तर कंपनीचे सेकेंडरी एम्पलॉई म्हणजेच काही प्रमाणांमध्ये या कंपनीचे शेअर असणारेही कोट्याधीश झाले आहेत.

अपेक्षेपेक्षा जास्त दर…

बुधवारी फ्रेशवर्क्सच्या स्टॉकला नॅसडॅकमद्ये ४३.५ डॉलर्स प्रति शेअर इतका दमदार ओपनिंग रेट मिळला. कंपनीला ३६ डॉलर प्रति शेअर या लिस्टिंग प्राइजवर विक्री होईल अशी अपेक्षा होती. मात्र या शेअर्सला चांगला प्रतिसाद मिळाल्याने अंदाजित रक्कमेपेक्षा शेअर्सला २१ टक्के अधिक दर मिळाला. कंपनीला १२.३ अब्ज डॉलर्सची मार्केट कॅप मिळालीय. यापूर्वी दोन वर्षांआधी फ्रेशवर्क्सने ३.५ अब्ज डॉलर्सच्या व्हॅल्यूएशनच्या आधारावर सिकोइका कॅपिटल्स आणि एक्सेलसारख्या गुंतवणुकदारांच्या माध्यमातून १५.४ कोटी डॉलर्सचा निधी उभा केला होता.