Maharashtra

४३ दिवसांत १० वर्षांहून कमी वयाच्या ७६,४०१ मुलांना कोरोना

By PCB Author

May 15, 2021

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या महाराष्ट्रात लहान मुलेही वाचलेली नाहीत. राज्यात गेल्या ४३ दिवसांत १० वर्षांहून कमी वयाच्या ७६,४०१ मुलांना कोरोनाने संक्रमित केले असल्याची माहिती एनडीटीव्हीने दिली आहे.  त्याच बरोबर १ जानेवारी २०२१ ते १२ मे २०२१ या काळात १० वर्षांहून कमी वयाच्या १ लाख ६ हजार २२२ मुलांना कोरोनाने संक्रमित केल्याची आकडेवारी आहे. गेल्या वर्षी हा आकडा ६७,११० इतका होता.

या दुसर्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण वेगाने होत असल्याचे पाहून राज्यांत मुलांसाठी आयसीयू तयार केले जात आहे. काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याची भीती आहे. राज्यातल्या डॉक्टरांच्या मते ७० टक्के मुलांचा कोविड रिपोर्ट हा निगेटिव्ह असून अँटीबॉडी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गंभीर अवस्थेत मुलांना इस्पितळात न्यावे लागत आहे.  या संदर्भात केजे सोमय्या रुग्णालयातील पीआयसीयूचे प्रमुख व पीडिआट्रिक इंटेसिविस्ट डॉ. इरफान अली यांनी सांगितले की मुलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. ६०-७० टक्के मुलांना ताप असतो. त्यांच्या अतिसार, शरीराला खाज सुटणे अशा तक्रारी असतात. ६०-७० टक्के मुलांच्या कोविड अँटिबॉडी पॉझिटिव्ह येत असतात.

या संदर्भातल्या एमआयएस-सी कॅटेगिरीनुसार पहिल्या कॅटेगिरीत मुलांना हलकासा ताप असतो. दुसर्या कॅटेगिरीत ताप खूप वाढतो, तिसर्या कॅटेगिरीत मुले हाय शॉकमध्ये जातात आणि रक्तदाब कमी होतो. अशा वेळी लवकर उपचार न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊन जाते. अशा मुलांना हायस्टेरॉइड व व्हेंटिलेटर सपोर्ट द्यावा लागतो.  डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अनेक मुले आपल्याला जाणवणारी लक्षणे सांगू शकत नाहीत. अशा वेळी आपल्या मुलांमध्ये कोणतीही हलकीशी लक्षणे दिसली तरी पालकांनी डॉक्टरांशी लगेच संपर्क साधावा व उपचार करावेत.