Desh

४३,००० किलोमीटर च्या ट्विट मुळे जे. पी. नढ्ढा जबरदस्त ट्रोल

By PCB Author

June 26, 2020

 

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारतीय लष्कर आणि चिनी लष्करातील सैनिकांमध्ये १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान ठार तसेच जखमी झाले. मात्र भारत चीनदरम्यानच्या या संघर्षानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने भारत चीन सीमेवर काय सुरु आहे हे जनतेला सरकारने स्पष्टपणे सांगावे, अशी मागणी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही भारतामध्ये घुसखोरी केलेली नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींनी जपून वक्तव्य करावीत, असा सल्ला दिला. मात्र मनमोहन सिंग यांच्या या सल्ल्यावर २२ जून रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विटवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र चार दिवसांपूर्वी नड्डांनी केलेलं हे ट्विट सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. या ट्विटमधील  43,000 km हा शब्द सध्या ट्विटवर ट्रेण्ड होत आहे. हा शब्द वापरुन मागील काही तासांमध्ये हजारो ट्विट करण्यात आल्याने तो ट्विटवर ट्रेण्डींगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मनमोहन सिंग काय म्हणाले होते

“पंतप्रधानांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या शब्दांचा वापर चीनला भारताचं समर्थन म्हणून वापरण्याची संधी पंतप्रधानांनी देऊ नये. नियंत्रण रेषेवरील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पर्याय वापरावेत तसंच ते चिघळू नयेत यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे,” असं डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्राद्वारे केलेल्या टीकेत म्हटलं होतं.

काय आहे नड्डा यांच्या ट्विटमध्ये…

त्यांच्या पत्रानंतर भाजपाध्यक्षांनी काही टि्वट करून काँग्रेस आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलं होतं. “४३ हजार किमी भारतीय भूमी चीनला बहाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाचेच डॉ. मनमोहन सिंग हे नेते आहेत. यूपीएच्या काळात कोणतंही युद्ध न होता आपला भूभाग गमावला. सातत्यानं आपल्या सैन्य दलांचा अपमान केला गेला,” असं नड्डा म्हणाले होते.