४० लाख बोगस मतदार, निवडणुका पुढे ढकला – प्रकाश आंबेडकर

0
389

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना आता निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांनी ही मागणी केली आहे. याचबरोबर राज्यभरात तब्बल ४o लाख बोगस मतदार तयार करण्यात आल्याचाही त्यांनी सत्ताधारी पक्ष भाजपावर आरोप केला आहे. मुंबईतील आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी ईव्हीएम बरोबरच आता सर्व पर्याय शोधत आहे. राज्यभरात तब्बल ४0 लाख बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या याद्यांचे निरीक्षण केल्यानंतरच आपण हे विधान करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकाच इपिक क्रमांकावर दोन मतदार दाखविण्यात आले आहेत.

तसेच ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया थांबवून याद्या दुरूस्त करूनच निवडणूक घेतली जावी अशी देखील मागणी केली जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. निवडणूक जवळ आल्यावर मतदारांना यादी पाहताना अडचणी येतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संकेतस्थळावर मतदार यादी उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.