Videsh

३०० अब्ज द्या अन्यथा बत्ती गूल

By PCB Author

May 10, 2022

इस्लामाबाद, दि. १० (पीसीबी) : चिनी कंपन्यांनी पाकिस्तान सरकारला उघडपणे धमकी दिली आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानने जर त्यांचे ३०० अब्ज रुपये दिले नाहीत तर, ते पाकिस्तानची बत्ती गूल करतील असा इशारा देण्यात आला आहे. चीनच्या या भूमिकेनंतर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला त्याचा जवळचा मित्र चीनकडून मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानने चीनी कंपन्यांची जवळपास ३०० अब्जांहून अधिकची रक्कम देणे बाकी आहे. दरम्यान, ही रक्कम न दिल्यास महिना अखेरपर्यंत नाईलाजास्तव पावर प्लांट बंद करावे लागतील असे चीनी कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आगाऊ पैसे न दिल्यास वीज प्रकल्प बंद करू, असे त्यांनी सांगितले.

चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत ३० चीनी कंपन्या पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत आणि पाकिस्तानच्या ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतर क्षेत्रांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा आहे. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यामध्ये सेवा देणाऱ्या चिनी कंपन्यांनी थकीत रकमेबाबत विचारणार करण्यात आली. त्यावेळी इक्बाल यांच्याकडे यावर काही बोलण्यासारखे नव्हते. या बैठकीत चीनी अधिकाऱ्यांनी इक्बाल यांच्याकडे क्लिष्ट व्हिसा प्रक्रिया, कर आदी विषयांबाबत अनेक तक्रारी मांडल्याने पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने म्हटले आहे. तसेच थकित रक्कम न भरल्यास आगामी काही दिवसात वीज प्रकल्प बंद करण्याचा इशारा चीनी कंपन्यांनी दिला आहे.