Banner News

४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सेवाविकास बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीला ‘ईडी’ ने घेतले ताब्यात

By PCB Author

July 02, 2023

आरोपींची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता १९ मे रोजी ‘ईडी’ ने केली जप्त

मुंबई, दि. २ (पीसीबी) पिंपरी-चिंचवडमधील सेवाविकास कॉ-ऑपरेटीव्ह बॅंकेतील ४२९ कोटी सहा लाख रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी या बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर अमर मुलचंदांनी यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजे ‘ईडी’ने मुंबईत आज (ता.१ जुलै) ताब्यात घेतले. याच प्रकरणात त्यांची आणि इतर आरोपींची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता १९ मे रोजी ‘ईडी’ ने जप्त केली आहे.

सेवाविकास बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात पोलिसांत २०१९ पासून अनेक गुन्हे दाखल असून त्यात मुलचंदानी यांना अटकही झाली होती. नंतर ते जामीनावर सुटून येताच या प्रकरणात ‘ईडी’ ची एंट्री झाली. त्यांनी याप्रकरणी मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यात यावर्षी २७ जानेवारीला मुलचंदांनी यांच्या पिंपरीतील मिस्त्री पॅलेस बंगल्यासह पुण्यात दहा ठिकाणी छापेमारी केली.

त्यात मुलचंदानीच्या घरातून पावणेतीन कोटी रुपयांचे घबाड त्यांच्या हाती लागले होते. त्यावेळी दरवाजा न उघडता ईडीच्या अधिकाऱ्यांना काही तास बाहेर मुलचंदांनी कुटुंबाने ताटकळत ठेवले होते. त्याबद्दल शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदवून पिंपरी पोलिसांनी त्यांना व कुटुंबातील सदस्यांनाही अटक केली होती. मात्र, मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीने त्यावेळी त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली नव्हती. ती आज केली.

मुलचंदानी हे भाजपाशी सबंधित आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप तसेच पिंपरी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे मुलचंदांनींशी जवळचे सबंध होते. त्यांच्या कार्यालयात त्यांची नियमित उठबस होती. शिंदे फडणवीस सरकारचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी कहर केला. जो लेखा परीक्षण अहवालआल्यानंतर ही कारवाई झाली त्यालाच त्यांनी स्थगिती दिली. महाविकास आघाडी सरकार असताना पोलिसांनी गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली होती. त्यानंतर बॅंक डबघाईस आली.

परिणामी रिझर्व बॅंकेने तिच्यावर प्रशासक नेमला. मात्र, त्याचाही उपयोग न झाल्याने सरतेशेवटी रिझर्व बॅकेने सेवाविकास बॅंकेचा परवानाच गेल्यावर्षी १० ऑक्टोबरला रद्द केला. पिंपरींतील सिंधी व्यापाऱ्यांची बॅंक म्हणून सेवाविकास बॅंक ओळखली जात होती.