२८ हजार कोटींचे नेहमीचे, हे वेगळे पॅकेज दिलेलं नाही – देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर नवाब मलिक यांची स्पष्टोक्ती

0
324

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – “केंद्र सरकारने राज्याला २८ हजार कोटी रुपये विविध योजनेअंतर्गत दिले. ते नेहमीचे आहेत. केंद्राने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतंही वेगळं पॅकेज दिलेलं नाही. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो. ते बंधनकारक असतं. ते पैसे नवीन योजनेसाठी खर्च करता येत नाहीत. त्याचा फायदा राज्य सरकारला झालेला नाही”, असं स्पष्टीकरण राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्याला कशाप्रकारे आर्थिक मदत केली गेली याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून राज्याला आतापर्यंत 28 हजार कोटी रुपयांची मदत विविध योजनांअंतर्गत देण्यात आली, असं सांगितलं. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.

“विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगतात, दीड लाख कोटी रुपयांचं कर्ज काढता येईल. ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे”, असा टोला नवाब मलिक यांनी फडणवीस यांना लगावला.

“महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर नाही. हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. भाजपकडून सध्या जाणीवपूर्वक राष्ट्रपती राजवटीची अफवा पसरवली जात आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी सरकार स्थिर राहील. दिल्लीपासून सर्व ठिकाणी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

‘राहुल गांधींचे वक्तव्य योग्यच’
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यात फरक आहे”, असं वक्तव्य केलं. यावरही नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.“राहुल गांधी यांचे वक्तव्य योग्यच आहे. कारण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही तर महाविकास आघाडीचे सरकार आहे. तीन पक्षांनी स्थापन केलेले हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्ही तिन्ही पक्षाचे नेते जनतेच्या सेवेसाठी एकजूट आहोत. कोरोना संकटाच्या काळात आम्ही एकजुटीने काम करत आहोत”, असं नवाब मलिक म्हणाले.