२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक

0
397

इस्लामाबाद, दि. १७ (पीसीबी) – लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली.  हाफिजला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. त्याचवेळी त्याला अटक होणार अशी चर्चा होती. हाफिजने फक्त मुंबईवरच नव्हे तर देशाच्या वेगवेगळया भागात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.

पाकिस्तानच्या हाफिजविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या कृतीवर हा सर्व डोळयात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याचे भारताने म्हटले होते. दहशतवादी कायद्याखाली पाकिस्तान सरकारने २०१७ साली हाफिझ सईद आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. पण ११ महिन्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

पाकिस्तान त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात ठोस, सत्याच्या कसोटीवर टिकणारी कारवाई करेल त्यावेळी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विचार करता येईल. काही वेळ आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी अशी कारवाई केली जाते असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले होते. सईदला यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अटक झाली होती. पण ती दाखवण्यापुरतीची कारवाई असल्चाचे नंतर स्पष्ट झाले होते.  पाकिस्तानवर मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय दबाव आहे. त्यामुळे हाफिज विरोधात ही कारवाई करावी लागली आहे.