Maharashtra

२६/११ च्या हल्ल्यावेळी विलासरावांना मुलाला चित्रपटात काम मिळण्याबाबत होती चिंता

By PCB Author

May 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुंबईत २६/११चा हल्ला झाला त्यावेळी तत्कालिन काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे केवळ त्यांच्या मुलाला चित्रपटात भूमिका मिळावी, यासाठी चिंतित होते. यासाठीच ते एका निर्मात्याला घेऊन घटनास्थळी गेले होते, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.

पियुष गोयल लुधियानामध्ये आयोजित  एका व्यावसायिकांच्या बैठकीत  बोलत होते. यावेळी त्यांनी विलासराव देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपाला काँग्रेसकडून कोणते उत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गोयल म्हणाले की, मी सुद्धा मुंबईकर आहे. मुंबईत २६/११ला झालेला दहशतवादी हल्ला सर्वांना आठवत असेल. त्यावेळीचे केंद्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार कमकुवत होते. त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख एका निर्मात्याला घेऊन हल्ला झालेल्या पंचतारांकित हॉटेलात गेले होते. त्यांना केवळ त्यांच्या मुलाला हिंदी चित्रपटांमध्ये  काम मिळावी,  याची  चिंता लागली होती, असे ते म्हणाले.