Maharashtra

२६ वर्षांनंतर अनिल गोटे पुन्हा शरद पवारांच्या दारात

By PCB Author

March 21, 2019

धुळे, दि. २१ (पीसीबी) –  धुळ्यातील भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

गोटेंनी मुंबईतील पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती गोटे यांच्या निकटवर्तीयांनी दिली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल २६ वर्षांनी भेट झाली. लोकसभेसाठी धुळे मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा करीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा स्वपक्षाविरुध्द बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्या अनुषंगाने पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आ. गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टिकास्त्र सोडले आहे. तेलगी मुद्रांक घोटाळा प्रकरण असो की कोणताही विषय असो.

गोटे आणि पवार यांच्यातील वाकयुद्ध सर्वज्ञात आहे. २६ वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळाले. तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यातील संघर्ष वाढला.

शरद पवार यांनी आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसकडे असून आम्ही आघाडी धर्म मोडणार नसल्याचे त्यांना सांगितले. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पवार हे चर्चा करणार असल्याची माहिती गोटे यांनी दिल्याचे निकटवर्तीयांनी म्हटले आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वी धुळे महापालिका निवडणूक झाली. यावेळी आ. अनिल गोटे यांनी भाजप विरोधात भूमिका घेतली होती. भाजपचे आमदार असणाऱ्या गोटे यांनी गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना कडाडून विरोध केला होता. आता त्यांनी पुन्हा डॉ. भामरेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी आपले कट्टर राजकीय वैरी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.