Maharashtra

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात परिवर्तन झालेले असेल- नवाब मलिक

By PCB Author

September 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – गेल्या सहा महिन्यांत आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे अशी जनतेची मानसिकता आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल येईल, तेव्हा महाराष्ट्रात परिवर्तन झालेले दिसेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ‘अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर ही मतदानाची तारीख जाहीर केली आहे. आम्हीही तयारीला लागलो आहोत. २० ते २१ ऑक्टोबरला निवडणुका होतील, याचा आम्हाला साधारण अंदाज होता. राज्यघटनेला अनुसरून निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, असे आयोगाने म्हटले आहे. त्या होतील अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून करतो, असे नवाब मलिक म्हणाले.

‘लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला ५० टक्के मते मिळाली होती. मत विभाजनाचा फायदा झाल्याने त्यांच्या जागा जास्त आल्या. जनतेलाही हे कळून चुकले आहे. त्यामुळे यावेळी लोके मतविभाजन टाळतील,’ असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.