२३ सप्टेंबर रोजी श्यामची आई कृतज्ञता सोहळा

0
365

पिंपरी, दि.: १६ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक दहा वाजता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या राळेगणसिद्धी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये श्यामची आई कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्शगाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या सोहळ्याच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. श्यामची आई कृतज्ञता सोहळ्यात टाटा मोटर्स लिमिटेडचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर यांना ‘श्याम’ आणि त्यांच्या मातोश्री सुशीला पारळकर यांना ‘श्यामची आई’ या सन्मानाने गौरविण्यात येईल. महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्या ‘कांडा’ या कादंबरीला ‘सानेगुरुजी बालसाहित्य पुरस्कार’ आणि भोसरी येथील श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे यांना ‘सानेगुरुजी विचारसाधना पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे; तसेच ‘सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्कारा’साठी नाना उर्फ जगन्नाथ शिवले (प्रेरणा माध्यमिक विद्यालय, थेरगाव), सुबोध गलांडे (ज्ञानदीप माध्यमिक व अनुसया वाढोकर उच्चमाध्यमिक विद्यालय, तळवडे) आणि श्रीकांत चौगुले (अण्णासाहेब मगर विद्यालय, पिंपळे-सौदागर) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली आहे.