२२ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २७ ऑक्टोबर रोजी भोसरीत होणार

0
360

– प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि वंचित विकास संस्थेला राष्ट्रीय बंधुता पुरस्कार

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक या संस्थाच्या वतीने इंद्रायणीनगर, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये २७ ऑक्टोबर २०२१ रोजी बाविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि स्वागताध्यक्ष प्रा. डॉ अशोककुमार पगारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी कवयित्री संगीता झिंजुर्के, प्रकाश जवळकर, प्राचार्य सदाशिव कांबळे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. डॉ. विजय ताम्हाणे अणि डॉ. अरुण आंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी बनसोडे यांच्या ‘बंधुतेची भाषा’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कारांचे वितरण होईल.

दुपारच्या सत्रात राष्ट्रकवी विलास ठोसर (अकोट) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे ‘काव्य पंढरी’ कविसंमेलन होईल. ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ या या स्वागत प्रमुख असतील. संगिता झिंजुरके सूत्रसंचालन करतील. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवीचा सहभाग राहील. यावेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते ‘बयो कविते…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. याप्रसंगी बबन धूमाळ यांना लोककवी वामनदादा कर्डक, पितांबर लोहार यांना लोकगायक प्रल्हाद शिंदे आणि दिनेश भोसले यांना पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

सायंकाळी राष्ट्रीय बंधुता पुरस्कार वितरणाने संमेलनाचा समारोप होईल. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे आणि वंचित विकास संस्था पुणे यांना यावर्षीचा राष्ट्रीय बधुता पुरस्कार प्रदान केला जाईल. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी काही गुरुजनांना साने गुरुजी मूल्यजागर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा, प्रकाश जवळकर आणि वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांची प्रमुख उपस्थिती राहील. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी रामदास जैद आणि प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.