२०२१ मध्ये जनगणनेसाठी मोबाइल अॅपचा वापर करणार – अमित शाह

0
362

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) -२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. देशात २०२१ मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर केला जाईल, असे अमित शाह यांनी जाहीर केले आहे. कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे, असे दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले. म्हणजेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे.

“जनगणना देशासाठी विविध कारणांमुळे महत्त्वपूर्ण आहे. जनगणनेमुळे केवळ लोकसंख्याच कळते असं नाही तर आर्थिक तपशील आणि अन्य अनेक महत्त्वाची धोरणं व अन्य संसाधनांचे वाटप करण्यासाठी जनगणना अत्यंत आवश्यक आहे. जनगणनेमुळे सरकारच्या योजना नागरीकांना मिळण्यास मदत होते. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमुळे (एनपीआर) देशातील अनेक समस्या सुटतील”, असेही शाह पुढे म्हणाले.

यापूर्वी एप्रिल महिन्यात, ‘जनगणना २०२१ मध्ये प्रथमच माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्याचे प्रस्तावित असून, त्याची चाचणी घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडेल . यात प्रथम टप्प्यात घरांची गणना करण्यात येईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशातील रहिवाशांची गणना पार पडेल’, असे सांगण्यात आले होते.