Banner News

२०२० नंतर ‘या’ प्रकारच्या वाहनांच्या विक्रीवर बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By PCB Author

October 24, 2018

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – देशभरात बीएस-४ इंजिनाच्या वाहनांची विक्री आणि नोंदणी १ एप्रिल २०२० पासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिले आहेत. दरम्यान गेल्या वर्षी न्यायालयाने बीएस-३ वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. तर भारतात २००० मध्ये पहिल्यांदा हे मानक लागू केले आहे.

बीएस -४ म्हणजे  भारत स्टेज- ४ हे वाहनांमधील इंधनाचे एक उत्सर्जन मानक असून भारत सरकारकडून ते निश्चित करण्यात आले आहे. या मानकांमध्ये वाहनामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या प्रमाणाची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे.

ऑक्टोंबर २०१० मध्ये देशात बीएस -४ मानक लागू करण्यात आले आहे. त्याचे पालन करणे सर्व वाहनांना बंधनकारक करण्यात आले आहे.  त्यानंतर देशभरातील १३ महत्त्वाच्या शहरांमध्ये एप्रिल २०१० पासून बीएस -४ मानक लागू झाले. मात्र, संपूर्ण देशात २०१७ मध्ये हे मानक लागू करण्यात आले होते.

देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने २०१६ मध्ये बीएस-५ मानकांऐवजी २०२०पर्यंत संपूर्ण देशात बीएस-६ मानक लागू कऱण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्लीतील प्रदूषणाची पातळी लक्षात घेता बीएस -६ वाहनांना एप्रिल २०२० ऐवजी एप्रिल २०१८ मध्ये लागू केले जाणार आहे.