२०१९ मध्ये विरोधी आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींच करतील – ओमर अब्दुल्ला

0
480

कोलकाता, दि. २९ (पीसीबी) – भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांच्या  जागा वाटपांमध्ये सर्वाधिक वाटा काँग्रेसला मिळायला हवा. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडेच राहील, असा विश्वास जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. 

ओमर अब्दुल्ला यांनी कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

ओमर अब्दुल्ला म्हणाले की,  विरोधी पक्षांना जागा वाटपात काँग्रेसला सर्वाधिक वाटा द्यावा लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अनेक राज्यांमध्ये थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होईल.  सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांचे बहुमत आवश्यक आहे. कुठल्याही प्रादेशिक पक्षाला हे मिळवणे शक्य नाही. कुठलाही प्रादेशिक पक्ष १०० पेक्षा अधिक जागा मिळवू शकणार नाही.  त्यामुळे सरकार स्थापनेची जबाबदारी काँग्रेसकडेच द्यावी लागणार आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसला ठाम विश्वास असल्याने  दुसऱ्यांनी त्यांच्यावर का आक्षेप घ्यावा.  सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी सर्वात पुढे असतील. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या खऱ्या नेत्या सोनिया गांधीच आहेत. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांना आक्षेप असल्यास गोष्ट वेगळी. दुसऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वावर आणि क्षमतेवर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही, असे ओमर अब्दुला म्हणाले.