२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार   

0
1189

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – आगामी २०१९च्या निवडणुकीत राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन अटळ आहे. आता ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या हातून सत्ता निसटून जाईल. त्याचबरोबर २०१९ मध्ये  कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे. तसेच आपण कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, २००४मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. त्या सारखीच परिस्थिती २०१९ मध्ये निर्माण होणार आहे. दिवंगत भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे पंतप्रधान मोदी यांचे व्यक्तिमत्व नाही. आता देशात बदल घडून येत आहे. आगामी निवडणुकीत देशाला बदल घडवायचा आहे. त्यामुळे देशात महायुतीचे सरकार येईल, असेही पवार म्हणाले.

भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांना एकत्रित आणण्यासाठी माझी पुढाकार घेण्याची भूमिका महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.  महाराष्ट्रातही महायुती होण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले. सर्व पक्षातील  नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे बहुमत ज्यांना जास्त असेल. त्यांना संधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. तुम्ही पंतप्रधान होण्यास इच्छुक आहात का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.