२०१९ मध्ये जिंकायचे असेल, तर भाजपचे नेतृत्व नितीन गडकरींच्याकडे द्या – किशोर तिवारी  

0
729

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला  जिंकायचे असेल, तर  भाजपचे नेतृत्त्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी शेतकरी नेते  व महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना पत्र लिहिले आहे. 

भाजपमधील काही अहंकारी नेत्यांमुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. नोटाबंदी, जीएसटी कर प्रणाली, इंधनाचे वाढलेले दर ही अहंकारी नेत्यांची धोरणेच पराभवाला कारणीभूत आहेत. भाजपच्या आत आणि बाहेरही या अहंकारी नेत्यांबद्दल नाराजीच सूर  आहे, असे तिवारी यांनी पत्रात लिहिले आहे.

जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनतेमध्ये विश्वासाचे आणि भयमुक्त वातावरण निर्मिती करण्यासाठी पक्षातील मवाळ नेत्यांकडे नेतृत्त्व देण्याची मागणी गावस्तरावर जोर धरत आहे. सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी शांत स्वभावाचे नेते नितीन गडकरी यांच्याकडे नेतृत्व द्यावे लागेल, अशी मागणी किशोर तिवारी यांनी या पत्रात केली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची  जबाबदारी  नितीन गडकरी यांच्याकडे दिली असतीष,  तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली असती. शिवाय छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही भाजपचा दारूण पराभव झाला नसता. अतिरेकी भूमिका घेणारे, हुकूमशाहीने पक्षाला आणि सरकारला चालवणारे नेते समाजाला तसेच देशाला घातक ठरतात. या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने नेतृत्त्व नितीन गडकरी यांच्याकडे  द्यावे, असे तिवारी यांनी पत्रात म्हटले आहे.