२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अविश्वास ठरावाच्या उलट दिसून येईल – संजय राऊत

0
580

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – अविश्वास प्रस्तावाच्या मतदानात सहभाग न घेण्याचा निर्णय योग्यच होता. शिवसेनेने वेळ चुकवलेली नाही, आम्हाला कुठे काय करायचे ते माहित आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि आम्ही त्याचे तंतोतंत पालन करतो, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आगामी लोकसभेत अविश्वास ठरावात जे चित्र दिसले,  ते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उलट दिसून येईल, असा दावा यावेळी राऊत यांनी केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राऊत यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान न करण्याच्या शिवसेनेच्या निर्णायाचे पुन्हा एकदा समर्थन केले.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून ‘भावा जिंकलंस’ या मथळ्याखाली राहुल गांधींच्या भाषणाचे कौतुक करण्यात आले आहे. राहुल गांधी हे योग्य विरोधक आहेत. देशातील जनतेच्या अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींनी भाषण केले. संसदेत एका चांगल्या विरोधकाची गरज असते, ते गुण राहुल गांधी यांच्यात आहेत, अशीही स्तुतीसुमने संजय राऊत यांनी उधळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही सिनेमे यायला हवेत. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचा दुसरा भागही येणार आहे. शिवाय कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर सिनेमा बनवणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.