२०१९ च्या निवडणुकीत पालघरमधून श्रीनिवास वनगांच उमेदवारी – उध्दव ठाकरे

0
703

पालघर, दि. ७ (पीसीबी) – पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी श्रीनिवास वनगा यांनाच देण्यात येणार आहे, अशी घोषणा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत केली.

पोटनिवडणुकीच्या वेळी श्रीनिवास वनगा, तुला १५ दिवस मिळाले होते, पण आता ८-९ महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही. आता ही जागा सोडायची नाही, असा आदेश उद्धव ठाकरेंनी वनगा यांना यावेळी दिला.आता नाटकं सुरु आहेत, खरंच पिक्चर अभी बाकी आहे, २०१९ चा हिरो तूच, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती करण्यात आल्याचे उध्दव यांनी सांगितले.

‘साम दाम दंड भेद वाल्या निवडणुकीत श्रीनिवास यांनी ‘त्यांना’ घाम फोडला. साम दाम दंड भेदचा वापर करुन इतकी मते मिळाली असतील, तर हा आमचा विजय आहे. ६ लाख मतदान हे भाजपच्या विरोधात झाले आहे. खिलाडूवृत्तीने हार स्वीकारावी लागते. मात्र, मी कोणत्याच पद्धतीने पराभव मान्य करायला तयार नाही. तो माझा विजयच मानतो, असे उद्धव म्हणाले.