२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ; मुख्यमंत्र्यांचा कवितेतून विरोधकांना टोला

0
1020

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन  ऐतिहासिक ठरले आहे. या अधिवेशनात विधानसभेत ११ तर दोन्ही सभागृहात १४ विधेयक पास  झाली आहेत.  अधिवेशनात विरोधकांनी मराठा आरक्षण, दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारची कोंडी केली. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  कविता आणि शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला. कवितेतून त्यांनी  भाजप-शिवसेना युती होण्याची संकेत दिले.  फडणवीसांच्या कोपरखळ्यांनी सभागृहात हलके-फुलके वातावरण तयार झाल्याचे दिसून आले. 

विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी सरकारची कामगिरीचा पाढा वाचून दाखवला. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिमटे काढले.

माझ्यावर टीकेची करुन कामना, विखे पाटीलसाहेब वाचतात सामना

संघर्ष यात्रेला लाभत नाही गर्दी, म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी

जनता जनार्दन आहे आमच्या बाजूला, म्हणून तुमची खुर्ची असेल त्याच बाजूला

२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ

मुख्यमंत्र्यांच्या या कवितेला विरोधकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. मुख्यमंत्र्यांनी नंतर शेरोशायरीही केली. तर  अखेरच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शांततापूर्ण चर्चा झाली.