२०१९च्या निवडणुकीनंतर भाजप विरोधी बाकावर – राजू शेट्टी

0
410

 कराड, दि. २२ (पीसीबी) –  देशात कमळ औषधालाही ठेवणार नसल्याचे मी जाहीर केले होते. त्यास आता शेतकऱ्यांचा पाठिंबा  मिळताना दिसत आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर  भाजप छोट्या गटात विरोधी बाकावर बसलेला दिसून येईल, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते  व खासदार राजु शेट्टी यांनी म्हटले आहे.  

कराडमध्ये शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यभरातील दुध उत्पादकांनी दुध विक्री न करण्याचा निर्धार करून दुध घरातच ठेवले. दुध संस्थांना उत्पादकांनी दुध दिलेच नाही. त्यामुळे राज्यातील १ कोटी ४० लाख लिटर दुध संकलनापैकी १ कोटी २० लाख दुधाचे संकलन झाले नाही. त्यामुळे मुंबई, पुण्यात तिसऱ्या दिवसापासुनच दुध टंचाई भासू लागली. शेतकरी दुध आंदोलनादरम्यान रस्त्यावर उतरल्यानंतर  राजकीय पक्ष, संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

दुध रस्त्यावर ओतल्याने राजु शेट्टींनी काय साध्य केले, अशी माझ्यावर टीका करण्यात आली.  मात्र, शेतकऱ्यांनी जसे रस्त्यावर दुध ओतले. तसेच गोरगरिबांना, विद्यार्थ्यांनाही दुधाचे वाटप  केले. १ कोटी ३५ लाख लिटर दुध चांगल्या कामासाठी वापरण्यात आले आहे.  भ्रष्ट झालेल्या पैशाला शेतकऱ्यांनी दुधाची आंघोळ घालून पवित्र केल्याने दुध आंदोलनांचे यश ऐतिहासिक ठरले आहे, असे शेट्टी म्हणाले.