२०० कोटींची वसुली, खरे काय ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
384

प्रखर राष्ट्रवादी, अत्यंत कर्तव्यदक्ष, लोकाभिमूख, रोखठोक, पोलिस खात्यात राहुनही माणूसकी जपलेला, जितका दयाळू तितकाच कणखर आदर्श अधिकारी, अशी पिंपरी चिंचवड शहराचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची स्वच्छ प्रतिमा. पोलिस स्टेशनची पायरी चढू नये किंवा पोलिसाचा नाद करून नये, असे सर्रास लोक म्हणतात. पण इथे कृष्ण प्रकाश यांनी पदभार घेतल्यापासून सगळी पोलिस ठाणी लोकांना आपलीशी वाटू लागली. जिथे लोक पोलिस आयुक्तांना भूमिपूजन, उद्घाटन अथवा लग्न सोहळ्याला निमंत्रणसुध्दा द्यायचे टाळत तिथे कृष्ण प्रकाश यांना दीड वर्षांत शेकडोंनी कार्यक्रमांत सेलिब्रेटी सारखे बोलवले. पोलिसाने मोठे भाषण, व्याख्यान किंवा तत्वज्ञान पाजळले तर लोक मनावर घेत नसतं, पण रोटरी, लायन्स क्लब पासून सभा संमेलनातून कृष्ण प्रकाश असे काही बोलत की लोक एकत राहत. भगवतगीता मुखोद्यगत असलेला हा माणूस. भल्या भल्यांना जे जमले नाही ते त्यांनी केले. अवघ्या पोलिस खात्याची प्रतिमा त्यांनी बदलून टाकली. दीड वर्षांत तब्बल ८ ते १० हजार लोकांना ते स्वतः प्रत्यक्षात भेटले आणि प्रश्न जागेवर सोडवले. पोलिस पैसेवाल्यांचेच एकतात अशी धारणा होती, पण कृष्ण प्रकाश यांनी ती बदलून टाकली. कष्टकरी, रिक्षावाले, पथारीवाले, पर्यावरणवादी, स्वयंसेवी संस्थांसाठी कृष्ण प्रकाश हे तसे खुले व्यासपीठ होते.

कोणा कुठल्या एका बिल्डरच्या जमिनीचा ताबा मारण्याच्या कामात त्यांनी पोलिसांची मदत दिल्याचा ठपका त्यांच्यावर आला, तशी छुपी तक्रार खात्याकडे केली आणि स्वप्नात नसताना रातोरात कृष्ण प्रकाश यांची बदली झाली. ते बदलून जाताच पोलिस सहनिरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने एक पत्र थेट मुख्यमंत्रांना पाठविण्यात आले आणि त्यात कृष्ण प्रकाश यांच्या काही चुकिच्या कामांचा उल्लेख केला. ते पत्र व्हायरल करण्यात आले. पाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही तशाच आशयाचे पत्र नवीन पोलिस आयुक्तांना दिले. स्वतः कृष्ण प्रकाश खूप नाराज झाले, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ज्यांच्या नावाने पत्र दिले गेले त्या अशोक डोंगरे यांनीसुध्दा ही कुरघोडीचा भाग असल्याचा खुलासा करत सखोल चौकशीसाठी नवीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना पत्र दिले. आयुक्तांनी त्या पत्राची चौकशी कऱण्याचे आदेश दिलेत. त्यावर कारवाई होते की नाही ते आताच सांगता येणार नाही. यापूर्वी असेच एक पत्र व्हायरल झाले होते, ते बनावट निघाले म्हणून फाईल बंद केली, पण त्यामुळे अनेकांची व्हायची ती बदनामी झाली. आता कृष्ण प्रकाश यांच्या बाबतीत जे पत्र व्हायरल झाले ते कोणी जर का एपीआय अशोक डोंगरे यांनी नाही लिहीले, तर मग त्या पत्राचा कर्ता करवीता कोण याचा शोध घेतलाच पाहिजे. जे मुद्दे उपस्थित केले त्यांचीही सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. ज्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय. पोलिस व पत्रकारांचीही प्रतिमा बदनाम होते आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सद्या जेलमध्ये आहेत, कारण १०० कोटी रुपयेंच्या वसुलीचे प्रकरण. आता कृष्ण प्रकाश यांच्यासारख्या पोलिस आयुक्तांकडून तब्बल २०० कोटींची वसुली होत असेल तर आपण कुठे चाललोत त्याचा मागोवा घेण्याची गरज आहे. तोंडाला येईल ते भंकस आरोप करुन चांगल्या व्यक्तीला बदनाम करायचे हे शडयंत्र असेल तर त्याचाही सोक्षमोक्ष लावला पाहिजे. २०० कोटींच्या वसुली मागचे सत्य काय ते लोकांसमोर येऊ द्या, अन्यथा लोक म्हणतील प्रत्येक पोलिस स्टेशनला आता नोटा मोजायचे मशिन ठेवा. पोलिसांना त्याच्या सरकारी वाहनात पेट्रोल टाकायला ठाण्यात दमडी शिल्लक नसते आणि तेच पोलिस २०० कोटीत लोळतात हे जरा नाही खूपच अतिरेकी चित्र वाटते.

खरे तर, अशोक डोंगरे यांचे आणि आमदार बनसोडे यांचे पत्र बारकाईने वाचले की त्यातला फोलपणा, सूडभावना स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची तशी दखल घेण्याची गरज नव्हती. पण त्यातील काही काही मुद्दे आणि परिस्थितीचे धागेदोरे कुठेतरी जुळतात म्हणून संशयाची पाल चुकचुकते. सर्वात महत्वाचे म्हणजे कृष्ण प्रकाश यांनी दीड वर्षांत विविध भानगडींतून तब्बल २०० कोटी रुपये वसूल केल्याचा अत्यंत गंभीर आरोप जनतेला खरा वाटतो का, त्यावर आता लोकांनी बोलले पाहिजे. मुकी, बहिरी, अंधळी जनता बोलत नसेल तर सत्य समोर येणार नाही. लोकभावना काय आहे ते कळले पाहिजे. किमान प्रथम दर्शनी त्या दोन्ही पत्रांत तथ्य दिसत नाही. पैसा, बाई, बाटली, बदला असे काही मुद्दे नेहमी पोलिस तपासात असतात. त्या अंगानेच आता या पत्रांची शहनिशा झाली पाहिजे. शहरात कृष्ण प्रकाश यांचे प्रचंड नाव झाल्याने ज्यांचा ज्यांचा जळफळाट झाला त्यांनी काहिशा सूड भावनेतून हे पत्र लिहीले असावे. शहरातील एकूण एक अवैध धंदे कृष्ण प्रकाश यांनी बंद केले होते. पोलिसांचे हप्तेखोरीचे परमनंट दुकान त्यामुळे कायमचे बंद झाले होते. वर्षाकाठी किमान ५० कोटींचा हप्ता वसुली होत असे, ती बंद पडल्याने ज्यांचे हितसंबंध दुखावले त्यांचे हे कारस्थान आहे. खात्याच्या साफसफाईसाठी आणि पोलिसांची इमेज सुधारण्यासाठी अनेक भ्रष्ट बड्या पोलिस अधिकाऱ्यांवर कृष्ण प्रकाश यांनी कारवाई केली. अनेकांचे निलंबनसुध्दा केले. पोलिसांची हप्तेखोरी बंद झाल्याने व्यापारी, उद्योजक, सामान्य जनता आणि सर्व समाज सुखावला होता, पण काळे धंदे करणारे सुडाने पेटले होते. गुंडा प्रवृत्तीच्या काही राजकारण्यांसाठीही कृष्ण प्रकाश हे वाटेतील अडथळा होते. सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना ४०० कोटी रुपयेंच्या घोटाळा प्रकऱणात अटक करायचे धाडस कृष्ण प्रकाश यांनी दाखविले. या बँकेचे दुसरे संचालक अशोक मुलचंदानी यांना अटक न करण्यासाठी ३ कोटी घेतल्याचे पत्रात म्हटले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ नाना गायकवाड यांच्यावर सावकारीसह अन्य गुन्हे दाखल करणारे कृष्ण प्रकाशच होते. भाजपाचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना खंडणीप्रकऱणात कोठडित टाकणारे कृष्ण प्रकाश असल्याने भाजपाची मंडळी नाराज होती. आमदार, खासदार, नगरसेवक यांचा सन्मान राखला जाई पण चुकिच्या कामांना स्पष्ट नकार होता. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाचा नेहरूनगरच्या तोडफोड घटनेत सहभाग होता म्हणून प्रचंड राजकिय दबाव असूनही कारवाई केली. आमदार बनसोडे यांना पालिकेच्या कचरा ठेकेदाराने धमकावल्याच्या प्रकरणात स्वतः बनसोडे हेच अडकल्याचे प्रकरण जगजाहिर आहे. त्यांनाही निमित्त मिळाले. शहरातील अशा सर्व असंतुष्ठांची एकी झाली आणि त्यांनी कृष्ण प्रकाश यांना काम दाखवले.

कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अवैध दारू, मटका, जुगार, वेश्याव्यवसाय, मसाज पार्लर, गुटखा पार्लरवर जितकी छापेमारी केली तितकी आजवर एकाही पोलिस आयुक्तांनी केली नाही. सुमारे दीड हजार गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या. ४५० गुन्हेगारांवर तडिपार, मोक्काची कारवाई केली. २५ वर टोळ्यांचे म्होरके आणि त्यांची पिलावळीचा कायमचा बंदोबस्त त्यांनी केला. शहरात होणारी वाहनांचो तोडफोड थांबली कारण, पोलिसांची जरब. पोलिसांच्या फिटनेससाठी या माणसाने अनेक उपक्रम राबविले, पोलिसांच्या मुलांना स्वयंरोजगार, नोकऱ्या मिळाव्यात म्हणून शिबिर घेतले. कोरोना काळात खास पोलिसांसाठी हॉस्पिटल बेड राखून ठेवले. थोडक्यात खात्याच्या आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंब प्रमुखा सारखे काम केले. पण काही घरभेदींनीच त्यांचा घात केला. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे बाल गुन्हेगारांची वाढती संख्या. अत्यंत गंभीर गुन्ह्यात तब्बल ४५० बाल गुन्हेगारांचा हात असल्याचे निष्पन्न झाले. ही किड नाहिशी कऱण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी बाल गुन्हेगार सुधार योजना आखली. शहरातील उद्योजक, स्वयंसेवी संस्था, माणसोपचार तज्ञ यांचे पथक केले आणि स्वतंत्र योजना राबवली. बालगुन्हेगारीमुळे शहर धोक्याच्या वळणावर होते ते वाचविण्यासाठी त्यांचा आटापिटा होता, पण आता त्यालाही सुरूंग लागला. पत्रकारांमधील गटबाजी, काही पत्रकारांची दुकानदारी बंद झाल्याने त्यांच्यासाठी कृष्ण प्रकाश अडचण होते. करुनही शेवटी कृष्ण प्रकाश त्या एका पत्रामुळे बदनाम झाले. केवळ एखाद्या सेवाभावी व्यक्तीला असे बदनाम करून त्याचे माणसिक खच्चीकरण करायचे आणि आपला कार्यभाग उरकायचा हा या पत्रांमागचा स्पष्ट हेतू. २०० कोटींची वसुली केली असेल तर कृष्ण प्रकाश यांच्यावर ईडी, सीबीआय ची कारवाई केली पाहिजे, पण तसे नाही. कारण त्या आरोपांत फारसे तथ्य नाही, पण पोलिसांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. वसुली असती तर ते काम गुन्हे शाखेचे लोक करतात म्हणून चार अधिकाऱ्यांकडे खासगीत विचारणा केली. एकानेही `हो` म्हटले नाही. पोलिसांमधील काही सज्जन मंडळीसुध्दा सांगतात त्यात तथ्य नाही, हे बदनामीचेच श़डयंत्र आहे. आता नवीन पोलिस आयुक्त चौकशी करतील त्यावेळी खरे खोटे समजेल. तुर्तास २०० कोटींची वसुली हे एक मिथक म्हणायला हरकत नाही.