Maharashtra

१७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, अजून भरपूर वेळ लागेल – शरद पवार

By PCB Author

November 16, 2019

मुंबई दि.१६ (पीसीबी) – महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा प्रश्न सुटता सुटत नाहीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार येणार का? हा प्रश्न ही कायम आहे. हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात अशी चिन्हं आहेत. अशात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापनेसाठी वेळ लागेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान चर्चेदरम्यान शरद पवार यांनी हे वक्तव्य केले . विदर्भाचा दौरा करुन शरद पवार यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यानंतर नितीन राऊत यांच्या घरी भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी १७ नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापन होणं अवघड असल्याचं म्हटलं आहे.

१७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असते. त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे संकेत दिले जात होते. मात्र शरद पवार यांनी ही शक्यता नाकारली आहे. नितीन राऊत यांच्या घरी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे हे उपस्थित होते. यावेळी १७ नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्या, अशी इच्छा लोखंडे यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली. मात्र १७ तारखेला अवघड आहे अजून भरपूर वेळ लागेल असे उत्तर शरद पवार यांनी दिलं.