१६० नवऱ्यांनी घातले ‘जिवंत’ पत्नींच्या नावाने श्राद्ध!

0
1201

वाराणसी, दि. १ (पीसीबी) – पत्नीकडून छळ होणाऱ्या पुरुषांचासाठीही महिलांप्रमाणे आयोग असावा, अशी मागणी भाजपचे खासदार हरिनारायण राजभर यांनी ३ ऑगस्टला संसदेत केली होती. यावर लोकसभेतले सगळे खासदार हसले होते, पण राजभर यांचे समर्थकही आहेत! १६० पुरुषांनी अलीकडेच त्यांच्या घटस्फोटित ‘जिवंत’ पत्नींच्या नावाने श्राद्ध घातलय!

स्त्रीवादाच्या राक्षसाचा सामना करण्यासाठी या पुरूषांनी हा विधी केला आहे. सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशन (एसआयएफएफ) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देशभरातल्या विविध ठिकाणच्या या १६० पुरुषांनी गंगेकाठी त्यांच्या माजी पत्नींच्या नावे पिंडदान आणि श्राद्ध केले. आपल्या लग्नाच्या वाईट आठवणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे विधी करण्यात आले. ‘पिशाच्यिनी मुक्ती’ ही एक तांत्रिक पूजा असते, तीही यावेळी करण्यात आली.

वास्तव फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि एसआयएफएफ चे अध्यक्ष मुंबईस्थित अमित देशपांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की मणिकर्णिका घाटावरील ही पूजा दु:खद आठवणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी असते.

एसआयएफएफ चे संस्थापक राजेख वखारिया नागपूरहून फोनवरून म्हणाले, ‘हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर ही आमची प्रमुख तक्रार आहे.’ राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार (एनसीआरबी), भारतात दर ६.५ मिनिटाला एक पती त्याच्या पत्नीच्या छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त होतो, असे वखारिया सांगतात. पण प्रत्यक्षात एनसीआरबी ने बायकोच्या छळामुळे आत्महत्या असे कुठेही म्हटलेले नाही. आत्महत्या केलेल्यांची नोंद विवाहित, अविवाहित अशी केलेली आहे.