१५ लाखांच्या आश्वासनाबाबत काहीच बोललो नव्हतो; नितीन गडकरींचा खुलासा

0
613

मुंबई, दि. १० (पीसीबी) – आम्ही सत्तेत येणार नाही, याची खात्री होती. त्यामुळे आश्वासन देत सुटलो, असे विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या विधानावर  खुलासा केला केला आहे. आपण १५ लाखांचा उल्लेख केलाच नव्हता,  असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने चुकीचे भाषांतर करत चुकीची बातमी छापल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.

गडकरी म्हणाले की, ‘दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने पूर्ण निराधार वृत्त छापले आहे. त्यावेळी मी ना मोदींचं, ना भाजपाचं नाव घेतलं, ना मी १५ लाखांचा उल्लेख केला’.

यावेळी त्यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्ती करण्याची घोषणा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना अशी घोषणा करु नका, आर्थिक दृष्टीने यामध्ये खूप अडचण येईल, असे सांगितले होते. यावर त्यांनी मस्करीत मला म्हणजे तुम्हाला आपले राज्य येईल, असा विश्वास आहे असे म्हटले. त्यावर मी आले तर आपल्याला पूर्ण करावे लागेल, असे म्हटले होते.

हा संपूर्ण कार्यक्रम मराठीत होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना कधीपासून मराठी कळायला लागले, त्यांनी कोणाकडून तरी मराठी शिकून घेतले पाहिजे. काहीच न समजता त्यांनी माझे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. जे मी बोललोच नव्हतो, असे ते म्हणाले.मी दिलेली आश्वासने पूर्ण  केलेली आहेत. कार्यक्रमात जो टोलचा उल्लेख झाला ते आश्वासनही महाराष्ट्र सरकारने पूर्ण केले आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. कृपया तुम्ही चुकीच्या बातम्यांनी प्रभावित होऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.