Desh

१५ ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथील करणार- सत्यपाल मलिक

By PCB Author

August 14, 2019

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात काही निर्बंध घातले होते. तसेच कलम ३७० हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथील केले जाण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्टनंतर जम्मू काश्मीरमधील निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली.

१५ ऑगस्टनंतर राज्यातील वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. तसेच फोन, इंटरनेट ही माध्यमे युवकांना भडकवण्याची तसेच त्यांची दिशाभूल करण्याची कामे करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोवर यावरील निर्बंध कायम राहतील असे त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीने यासंबंधी वृत्त दिले आहे. दरम्यान, आठवडाभरात किंना दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर यावरील निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानी यावेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी यांच्याकडे माहितीचा अभाव आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांना काश्मीरमध्ये येण्यासाठी दिलेले निमंत्रणही मागे घेतले. राहुल गांधी यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. तसेच त्यांच्यासाठी विमान पाठवणार असल्याचे म्हटले होते. यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देत आपल्याला विशेष विमानाची नाही तर फिरण्याच्या स्वातंत्र्याची गरज असल्याचे म्हटले होते. तसेच आपण विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीमंडळासोबत येणार असल्याचे सांगितले होते.