१५ ऑक्टोबरपूर्वी कामे पूर्ण करा; केंद्राची अधिकाऱ्यांना डेडलाइन

0
332

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – केंद्र सरकारने १६७ कामांची एक यादी तयार केली आहे. या कामांना केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला १०० दिवस पूर्ण होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ही कामे १५ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. यामध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये ३ लाख प्राध्यापकांच्या रिक्त पदांना भरण्याच्या कामाचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, १०० दिवसांच्या कार्यक्रमांच्या अजेंड्यात १६७ ‘ट्रान्सफॉर्मिंग आयडिया’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रिमंजळ सचिव प्रदीप सिन्हा यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, एकॉनॉमिक टाईम्सला मंत्रिमंडळ सचिव प्रदीप सिन्हा यांचे पत्र मिळाले आहे. यामध्ये नव्या कल्पना लागू करण्यासाठी ५ जुलै ते १५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मंत्रालयाकडून अनेक टप्प्यांवर प्रेझेंटेशन दिल्यानंतर तसचे उच्चस्तरीय चर्चेनंतर १०० दिवसांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची महत्त्वपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये सचिवांना आपल्या देखरेखीखाली नव्या कल्पना लागू करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्येक आठवड्याला या कामांच्या अहवालावरून त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच दर शुक्रवारी याची समिक्षा करण्यात येणार आहे.

दरम्यान, या कामांमध्ये अनेक प्रशासनिक कामांचाही समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख व्यवस्थेमध्येही काही बदल करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. या अंतर्गत सामान्यांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही आणि त्या सोडवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.