Maharashtra

१४०` आकड्याने सुरू होणाऱ्या क्रमांकाचे व्हायरल सत्य काय, जाणून घ्या

By PCB Author

July 11, 2020

मुंबई., दि. ११ (पीसीबी) वेब मालिकेसाठी ‘सोनी लीव’ने निर्माण केलेल्या जाहिरातीमुळे मुंबईत शुक्रवारी घबराट पसरली. ‘१४०’आकडय़ाने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून दूरध्वनी आल्यास घेऊ नका, आर्थिक गंडा घातला जाईल, अशी सूचना पोलीस वस्त्या-वस्त्यांमध्ये देत आहेत, अशा ध्वनिचित्रफिती शुक्रवारी संध्याकाळी समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरल्या. चित्रफितीत पोलीस, पोलीस वाहन आदी दिसत असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि ही अफवा जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवली. प्रत्यक्षात चित्रफितीत पोलीस नव्हते. पोलिसांप्रमाणे गणवेश परिधान केलेले ‘सोनी लीव’चे कर्मचारी/कलाकार होते.

या ध्वनिचित्रफीती पाठोपाठ मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या नावे ही अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे अनेक पोलिसांनी हा मजकूर‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’ म्हणून जाहीर के ला. मात्र हा आभास सोनी लीव या ओटीटी प्लॅटफॉर्मने नव्या वेबमालिके च्या जाहिरातीसाठी रचला असल्याचे समजताच नागरिकांनी ट्विटरद्वारे खरपूस समाचार घेतला. राज्याच्या सायबर विभागानेही तातडीने सोनी लीवचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. सिंह यांना संपर्क साधून हा प्रकार लागलीच थांबवण्याची सूचना दिली. या प्रसंगाबाबत सायबर विभाग आपला अहवाल मुंबई पोलिसांना देणार आहे, असे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.