१२ आमदार आणि एक विद्यमान खासदार भाजपाला धक्का देणार ?

0
436

महाराष्ट्र, दि.५ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा एक आठवडा पूर्ण होत असताना १२ आमदारांनी; तसेच राज्यसभेच्या एका विद्यमान खासदाराने भाजपला ‘धक्का’ देण्याची तयारी चालविली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ‘मेगाभरती’अंतर्गत भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे १२ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे. पक्ष बदलण्याचे टायमिंग चुकलेल्या या आमदारांची राजीनामे देण्याची तयारी असून ते तिन्ही पक्षनेत्यांच्या संमतीची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असलेल्या आमदारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.