Others

११ आमदारांपासून सुरू झालेले बंड ४६ वर पोहोचले ? अजून संख्या वाढण्याची शक्यता

By PCB Author

June 22, 2022

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आजवरचे सर्वात मोठे बंड पुकारले आहे. गुजरातेतील सुरतमधून शिंदे आणि त्यांचे आमदार आज पहाटेच आसाममधील गुवाहाटीत गेले. काल सकाळी ११ आमदारांपासून सुरू झालेले त्यांचे बंड आज ४६ आमदारांपर्यंत पोहोचले आहे.

महाराष्ट्रातील या महानाट्याला परवा रात्रीपासून नाट्यमय घडामोडी होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान असलेले नेतेही एक-एक करून शिंदेंना जाऊन भेटले आहेत. थेट पक्षश्रेष्ठींवरच सर्वांची नाराजी दिसत आहे. त्यातल्या त्यात शिंदे यांच्या क्षेत्रात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्या चमूचा हस्तक्षेप शिवसेनेच्या आमदारांना खटकला असल्याचे सांगण्यात येते. सध्यापर्यंत ४६ असलेली बंडखोरांची संख्या वाढणार असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्‍वासू यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे आमदार संजय राठोडही आता एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हणजे गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. कालपासून एका पाठोपाठ धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरेंना हा पुन्हा एक मोठा धक्का आहे. कारण काल रात्रीपर्यंत संजय राठोड त्यांच्यासोबत होते. काल रात्री आदित्य ठाकरेंच्या गाडीमध्ये ते सोबत होते. कुठल्याही परिस्थितीत संजय राठोड मातोश्री सोडणार नाही, अशी परिस्थिती काही तासांपूर्वीपर्यंत होती. पण आज सकाळी ते गुवाहाटीकडे रवाना झाल्यामुळे आता कोण आपला आणि कोण बंडखोर, हे ओळखणे अवघड होऊन बसले आहे.

ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री राहून चुकलेले संजय राठोड यांना एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही काळ त्यांना अज्ञातवासात काढावा लागला होता. तेव्हा मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आपल्यासोबत राहिले नाही, ही खंत संजय राठोड यांना होतीच. त्यांनी कम बॅक करण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले होते. पण त्यात ठाकरेंनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना यश आले नव्हते. एक प्रकारे उद्धव ठाकरेंवर त्यांची नाराजी होतीच. आता गुवाहाटीची वाट धरून राठोडांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.