Maharashtra

“१० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका ‘गबरुवर’ कारवाई नाही”

By PCB Author

February 24, 2021

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव सध्या चर्चेत आहे. या प्रकरणावर १५ दिवस गप्प राहिल्यानंतर पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन करत काल राठोड यांनी बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट वाढत असताना असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता याच विषयावरून भाजपाने शिवसेनेला खडेबोल सुनावलेत. “करोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही,” असा सणसणीत टोला भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

◆कोरोना काळात गर्दी केली म्हणून 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका "गबरुवर" कारवाई नाही❓
◆ एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मा.मुख्यमंत्री बोलणार नाहीत❓
महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे…
तो मी नव्हेच,‼️

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 24, 2021

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड यांनी काल पोहरादेवी येथे पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी या पोहरादेवीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनवलेले नियम अक्षरशः पायदळी तुडवले गेले. त्यामुळे या सर्व प्रकारावर भाजप नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला आहे.“करोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे… तो मी नव्हेच,” अशी टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.