१०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान

0
418

मुंबई, दि. २ (पीसीबी) – मुंबईतील गिरीविहार या ट्रेकर्सच्या क्लबशी संबंधित असलेले व शंभरी गाठलेले ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे काल निधन झाले आहे. विश्वास देसाई यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही बातमी ट्रेकर्सना व दुर्गप्रेमींना कळवली आहे. डॉ. वसंत देसाई यांचे वैशिष्ट्य म्हणजे १९६६च्या हनुमान एक्सपिडिशनमध्ये ते डॉक्टर म्हणून सहभागी झाले होते.

गिरीविहारचे माजी अध्यक्ष महेश देसाई जे स्वत: या मोहिमेचे भाग होते त्यांनी सांगितले की डॉ. देसाई नंतरही १९७३ मध्ये राजरंबा चौदराच्या एक्सपिडिशनमध्ये डॉक्टर म्हणून सहभागी झाले. परंतु हिमालयाची व सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांची आवड असलेले देसाई केवळ डॉक्टर नव्हते तर ट्रेकर होते व दुर्गप्रेमी होते. गिरीविहारच्या सुरूवातीच्या काळापासून ते संस्थेशी संलग्न होते. गिरीविहारला वेळोवेळी मदत करणाऱ्या डॉ देसाईंनी जेव्हा गरज पडली तेव्हा आपला संपर्क वापरून आर्थिक मदत मिळवून देण्यातही पुढाकार घेतला होता अशी आठवण महेश देसाईंनी सांगितली.

वयाची शंभरी गाठलेल्या डॉक्टरांना रोज चालण्याची सवय होती. हिमालय व सह्याद्रीमध्ये असंख्य ट्रेक केलेल्या डॉ देसाईंची जीवनशैली अत्यंत आदर्श होती. योगविद्येबरोबरच योग्य तो व्यायाम व आहारावर त्यांचा कटाक्ष होता. मुंबईतल्या सगळ्यात जुन्या अशा ट्रेकरपैकी एक असलेल्या डॉ वसंत देसाईंना ट्रेकर्सनी अभिवादन केले आहे.