Pimpri

१०० कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत – गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीच्या या नेत्याला टोला

By PCB Author

January 25, 2021

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षप्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. आमदार शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे उलटपक्षी त्यांच्यावरच टीकेचा भडिमार सुरू झाला असून राष्ट्रवादी गोत्यात आली आहे.

“काही लोकांचा काहीतरी बोलून राष्ट्रवादीत स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे निवडणूक हरलेले आहेत, त्यांना कोण कशासाठी पैसे देईल? १०० कोटी म्हणजे गोळ्या-बिस्कीट नाहीत, जे यांना देतील. त्यांना घोटाळे करण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असे मोठे आकडे येतात. ग्रामपंचायतमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. त्यामुळं काहीतरी विधान करून मी राष्ट्रवादीत कसा प्रामाणिक आहे, बाहेरचे लोक बोलवत असताना देखील मी गेलो नाही, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचा खोट्या पद्धतीने बाऊ केला जातोय. त्यामुळं जास्त गंभीर्याने घेण्याची गरज नाही.” असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात हेळवे समाजाच्या मेळाव्यास आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला होता.