१००व्या स्वातंत्र्यदिनीही काश्मीर भारताचा भाग नसेल- वायको

0
540

चेन्नई, दि. १४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता राज्यसभेतील खासदार आणि एमडीएमके प्रमुख वायको यांनीही भाजप सरकारवर टीका करताना जम्मू-काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. १००व्या स्वातंत्र्यदिनीही काश्मीर भारताचा भाग होणार नाही, असे ते म्हणाले.

‘भारत १००वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असेल तेव्हाही काश्मीर भारताचा भाग नसेल,’ असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप सरकारवरही निशाणा साधला. भाजपने काश्मीरचे मातेरे केले आहे. याआधीही मी काश्मीर मुद्द्यावर आपले मत मांडले आहे, असे ते म्हणाले. राज्यसभेत ५ ऑगस्टला कलम ३७० हटवण्यासंबंधी प्रस्ताव ठेवण्यात आला, त्यावेळी वायको यांनी विरोध दर्शवला होता. आजचा दिवस सर्वात दुःखद आहे. काश्मिरी जनतेला दिलेले आश्वासन पाळले नाही, असे ते म्हणाले होते.

गेल्या महिन्यात वायको यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान हिंदीच्या मुद्द्यावरूनही वादग्रस्त विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.