ह्दयद्रावक: पुण्यात मुलीला कीटकनाशक पाजून आईची आत्महत्या

0
713

नऱ्हे, दि. २३ (पीसीबी) – दारूड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आईने चार वर्षांच्या चिमुकलीला कीटकनाशक पाजून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नऱ्हे येथील शिवशक्ती पॉवर डिव्हाइस शेजारी घडली. या घटनेत मुलगी बचावली असून आईचा मृत्यू झाला आहे.

गोकुळा शामराव साबळे (वय २५, रा. नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कुंडलिक भुरके यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शामराव राजाराम साबळे (वय २८, शिवशक्ती पॉवर डिव्हाइस शेजारी, नऱ्हे, मूळ- सिरड, शहापूर, ता. औंढा जि. हिंगोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, शामराव आणि गोकुळा हे पती-पत्नी असून शामरावला दारूचे व्यसन असल्याने त्या दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. सोमवारी देखील त्या दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात गोकुळाने चार वर्षाच्या स्वत:च्या मुलीला कीटकनाशक पाजले. तसेच तीने स्वत: देखील किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. घटना समोर येताच काहींनी त्या दोघींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मुलगी बचावली मात्र गोकुळा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंह रस्ता पोलिसांनी शामराव याच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील तपास करत आहेत.