Desh

“हो, आहे मी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट”; पाकिस्तानी अभिनेत्याची कबुली

By PCB Author

August 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – पाकिस्तानमधील एका लोकप्रिय अभिनेत्याने स्वत:ला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयचा ऐजंट असल्याचे म्हटले आहे. भारतामधील एका वत्तवाहिनीच्या वृत्तांकनावर संतापलेल्या या अभिनेत्याने ट्विटवरुन हे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानमधील हमजा अली अब्बासी याने ट्विटवर एका वृत्तवाहिनीच्या वार्तांकनाचे फोटो शेअर करत एक वादग्रस्त ट्विट केले आहे. अब्बासी हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्तीय मानला जातो. भारताच्या स्वातंत्र्य दिनी अब्बासीने एक ट्विट केले होते. त्यात त्याने ‘एका भारतीय वृत्तवाहिनीने मी आयएसआयचा गुप्तहेर असल्याचा दावा केला आहे. हे चुकीचे आहे. मी गुप्तहेर नसून उघडपणे हे मान्य करतो की मी आयएसआयसाठी काम करतो. तसेच मीच नाही तर पाकिस्तानमधील सर्व २० कोटी लोक आयएसआयसाठी काम करतात,’ असे म्हटले आहे.

हमजाच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये झालेल्या पाकिस्तानमधील निवडणूक प्रचारादरम्यान हमजा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ पक्षाच्या प्रचारसभांमध्ये दिसला होता. त्यानंतर तो आयएसआयसाठी काम करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.