हॉटेल मालकावर कोयत्याने सपासप वार; मात्र, उपचारादरम्यान पहाटे मृत्यू

0
487

पुणे, दि.२१ (पीसीबी) : पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा उपचारादरम्यान पहाटे मृत्यू झाला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याप्रकरणी खुनाच्या गुन्हाचे कलम वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली. रामदास आखाडे (वय 38) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रामदास हे त्यांच्या हॉटेल गारवा समोर खुर्चीवर बसले होते. ते फोनवर बोलत असताना पायी चालत त्यांच्याजवळ असलेल्या अज्ञात तरुणाने त्यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उरळी कांचन परिसरात हॉटेल गारवा प्रसिद्ध आहे.
दरम्यान याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले आहे.