हॉटेल फॉर्च्युनमध्ये आग, २५ डॉक्टर बचावले

0
277

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमा या चित्रपटगृहाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आगीचा भडका उडाला आहे. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली असून या हॉटेलमध्ये डॉक्टर्स वास्तव्याला असल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने डॉक्टर्स सुखरूप बाहेर आले आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अवघ्या काही वेळात आगीच्या विळख्यातून २५ डॉक्टरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असून बाकी कुणी हॉटेलमध्ये अडकलं आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे २५ डॉक्टरांचे प्राण वाचू शकले आहे.

अग्निशमन दलाच्या ५ फायर गाड्या आणि ४ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. बचावकार्य संपल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.