हॉटेलमध्ये दारू पिऊन मुलीला त्रास देणा-यास जाब विचारणा-या ग्राहकाला मारहाण; हॉटेल मॅनेजर, जागा मालकावर गुन्हा दाखल

0
340

हिंजवडी,दि.०४(पीसीबी) – एक तरुण हिंजवडी येथील हॉटेल एफ एम एल मध्ये दारू पिऊन एका मुलीला त्रास देत होता. त्याला हॉटेलमधील एका ग्राहकाने जाब विचारला. त्यावेळी दारू पिलेल्या व्यक्तीने जाब विचारणा-यास मारहाण केली. त्याला हॉटेलमधील मॅनेजर, जागा मालक आणि अन्य लोकांनी साथ दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ ते एक जानेवारी रात्री साडेबारा वाजताच्या कालावधीत घडली.

निनाद प्रशांत सोनपावले (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हॉटेल एफ एम एलचे मॅनेजर, हॉटेल जागा मालक आणि त्याचे साथीदार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनपावले त्यांच्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी हिंजवडी येथील हॉटेल एफ एम एल येथे गेले. जेवण करत असताना त्यांच्या शेजारच्या टेबलवर एक मुलगा दारू पिऊन मुलीला त्रास देत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी मुलाला जाब विचारला. त्यावरून मुलाने फिर्यादी यांना हाताने मारहाण करून झटापट केली. त्यात त्यात फिर्यादी यांचा मित्र बाळा भोसले याच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाली.

मारहाण करणा-या मुलाला हॉटेलच्या मॅनेजरने मागील दरवाजाने बाहेर काढले. फिर्यादी यांचा दुसरा मित्र हरीश दाभाडे याने त्याचा भाऊ यशवंत दाभाडे यांना बोलावून घेतले. हॉटेल मॅनेजरने यशवंत दाभाडे यांना शिवीगाळ केली. त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. हॉटेलच्या मॅनेजरने त्याच्या साथीदारांना बोलावून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. संपूर्ण प्रकारात 75 हजारांच्या सोन साखळ्या जबरदस्तीने हिसकावून घेतल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.