हॉकी संघातून आठ जणींचे ऑलिंपिक पदार्पण

0
216

बंगळूर, दि.१८(पोसीबी) – टोकियो ऑलिंपिकसाठी भारताने आज महिलांच्या १६ सदस्यीय हॉकी संघाची घोषणा केली. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी आठ जणी ऑलिंपिक पदार्पण करणार आहेत.

हॉकी इंडियाने जाहिर केलेल्या १६ सदस्यीय संघातील अन्य आठ जणी या गेल्या रियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झाल्या होत्या. आठ अनुभवी आणि आठ अननुभवी अशा संघ रचनेच भारताने पसंती दिली आहे.

ऑलिंपिकसाठी राणी रामपाल हिच्याकडेच संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर, उदिता निषा, नेहा, नवनीत कौर, शर्मिली देवी, लार्लेमसिआमी आणि सलिमा टेटे. लार्लेमसिआमी ही मिझोरामची पहिली आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ठरली आहे. त्याचबरोबर सलिमा टेटे हिने २०१८ युवा ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. भारतीय संघ त्या वेळी रौप्यपदकाचा मानकरी राहिला होता.

भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये खेळणार आहे. तसेच त्यांची ही सलग दुसरी स्पर्धा असेल. यापूर्वी भारतीय महिला १९८० आणि २०१६ ऑलिंपिक स्पर्धेत खेळल्या होत्या.

भारतीय संघाबद्दल बोलताना प्रशिक्षक शुअर्ड मरिने म्हणाले,’भारतीय संघाने गेली काही वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. सातत्याने त्यांच्या खेळात प्रगतीच झाली आहे. अनुभव आणि नव्या गुणवत्तेचा या संघात चांगला समन्वय साधला गेला आहे. टोकियोमध्ये आजपर्यंतचा सर्वोत्तम खेळ करू. अपरिमीत गुणवत्ता आणि क्षमता असलेला हा संघ आहे. हा संघ आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाटी कटिबद्ध असेल आणि तशी कामगिरी करूनही दाखवेल अस विश्वास आहे.’

संघ – गोलरक्षक – सविता, बचावपटू – दीप ग्रेस एक्का, निक्की प्रधान, गुरजित कौर, उदिता, मध्यरक्षक – निशा, शिला चानू पुख्रामबाम, मोनिका, ननज्योत कौर, सलिमा टेटे, आक्रमक – राणी, नवनीत कौर, लार्लेमसिआमी, वंदना कटारिया, शर्मिला देवी