हैदराबाद कसोटीत भारताचा दहा गडी राखून विजय; वेस्ट इंडिजविरूध्दची मालिका २-० जिंकली

0
625

हैदराबाद, दि. १४ (पीसीबी) – हैदराबाद कसोटीत भारताने दहा गडी राखून वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला.  या विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली.  या सामन्यात विंडीजने टीम इंडियाला विजयासाठी ७२ धावांचे माफक लक्ष्य दिले होते. सलामीच्या पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलने सतराव्या षटकात  भारताचा विजय निश्चित केला.

पृथ्वीने चार चौकारांसह नाबाद ३३ धावांची, तर लोकेश राहुलने एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३३ धावांची खेळी उभारली. याआधी राजकोटच्या कसोटीत टीम इंडियानं विंडीजचा एक डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला होता.

त्याआधी भारतीय गोलंदाजांच्या भेदक  माऱ्यासमोर विंडीजचा दुसरा डाव अवघ्या १२७ धावांत गुंडाळला. भारताकडून उमेश यादवने दुसऱ्या डावात विंडीजच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजाने ३ गडी बाद केले. तर रविचंद्रन अश्विनने २ तर कुलदीप यादवने १ बळी टिपला. विंडीजकडून सुनील अँब्रोसने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली.

पहिल्या डावात अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतने  दीडशतकी भागिदारी केली.  टीम इंडियाचा पहिला डाव ३६७ धावांत आटोपला. टीम इंडियाला पहिल्या डावात अवघी ५६ धावांचीच आघाडी मिळाली होती. अजिंक्य रहाणेने सात चौकारांसह ८० धावांची खेळी केली. तर रिषभ पंतचे शतक सलग दुसऱ्या कसोटीतही हुकले. त्याने ११ चौकार आणि दोन षटकारांसह ९२ धावा कुटल्या.