Desh

हैदराबादमध्ये पुन्हा थरार; आंतरजातीय विवाह केल्याने बापाचा मुलगी आणि जावयावर कोयत्याने हल्ला; मुलीचा तोडला हात

By PCB Author

September 20, 2018

हैदराबाद, दि. २० (पीसीबी) – मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतापलेल्या बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर कोयत्याने जबर वार करुन मुलीचा हात तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जावईसुध्दा गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.१९) हैदराबादच्या मध्यवर्ती भागात घडली.

माधवी चारी (वय २०) आणि बी. संदीप (वय २२) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पती-पत्नीचे नावे आहेत. याप्रकरणी बंजारा हिल्स पोलिसांनी आरोपी बाप मनोहर चारी (वय ४२) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप आणि माधवीमध्ये मागच्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संदीप हा दलित होता. यामुळे माधवीचे वडिल मनोहर चारी यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. यामुळे माधवी आणि संदीपने १२ सप्टेंबरला गपचुपपणे बोलारम येथे लग्न केले. बुधवारी दुपारी मनोहर यांनी मुलीला फोन करुन आपल्याला तुमचा विवाहाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. त्यांनी मुलीला समेटासाठी नवऱ्याला सोबत घेऊन येण्यास सांगितले. माधवीचा देखील वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसला व ती नवऱ्यासोबत गोकुळ थिएटर येथे पोहोचली. दोघा नवरा-बायकोंनी त्यांची स्कूटर पार्क केली व ते वडिलांच्या येण्याची वाट पाहत होते. दुपारी तीनच्या सुमारास मनोहर तिथे बाईकवरुन पोहोचला. बाईकवरुन उतरताच त्याने जवळ असलेला कोयता बाहेर काढला व संदीपवर वार करण्यास सुरुवात केली. संदीपने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तिथून पळ काढला. मात्र मनोहर यांनी त्यांची पोटची मुलगी माधवी हिच्यावर कोयत्याने जबर वार करुन एक हात तोडला. बंजारा हिल्स पोलिसांनी आरोपी मनोहर याला अटक केली आहे.