हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका – राम शिंदे

0
354

नगर,दि.१(पीसीबी) – माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.

“हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे, प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही” असा आरोप राम शिंदे यांनी केला.

दरम्यान, “आजचं आंदोलन महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत” असं राम शिंदे म्हणाले.